चूल ते Modern Kitchen

 चूल ते Modern Kitchen

 काळ्याभोर शेतात लाकूड, माती आणि तणसानी बनवलेली ती छपराची घरं, सभोवताली मोठी , हिरवीगार निंबाची, बाभळीची झाडं,भलं मोठं आंगण.. अंगणात दगडाचं तुळशी वृंदावन आणि त्यात बहरलेली तुळस..  ह्या अशा सुंदर घरात एका बाजूला असायचं स्वयंपाक घरं . स्वच्छ शेणानी सारवलेलं, भिंती पांढऱ्या (शाडूची) माती ने पोतेरालेल्या, एका बाजूला असलेली चूल ती हि शाडूच्या मातीने लेपलेली . सारवणे, पोतेरा देणे, लेपने हे तेव्हाचे शब्द जे आताच्या पिढीला माहित नसावेत आणि आपली कदाचित शेवटची पिढी असेल असे शब्द माहिती असणारी. असो.. 


तर अश्या ह्या स्वयंपाक घरात एका बाजूला  मांडलेली चूल, त्याशेजारी व्यवस्तीत रचून ठेवलेलं सरपण (बऱ्याचदा ते काटेरी असायचं.  more precisely चिलारीचं जळन ). पाठीमागे असणार मोठं लाकडी कपाट आणि त्यात मांडून ठेवलेली मोठी लोखंडी आणि तांब्या पितळेची भांडी जस कि गोल आणि कडीचे डबे, हंडे, कळशी, पराती, चरवी, चंबू, गंज, खिसणी, लोखंडी किंवा बिडाचा (एक प्रकारचा धातू) तवा.. इत्यादी .  एका कोपऱ्यात बसवलेलं जातं , शेजारीच जमिनीत रोवलेलं उकळ आणि पार, चुलीशेजारी हाताशी असणारा खलबत्ता, फुकारी / फुकनी, केरोसीनचा दिवा/चिमणी/कंदील , लोखंडी सांडशी, उलतण, लाकडी दांडा असणारा चाकू,विळी. याचबरोबर विस्मरणात गेलेल्या काही वस्तू जस कि चपाती/भाकरी ठेवण्यासाठी वापरली जाणारी दुरडी, size ने मोठा असणारा दूरडा, खीर किंवा कुरवड्यानचा चीक वैरण्यासाठी वापरला जाणारा पळीच्या आकाराचा पण लांब चमचा ज्याला "चाटू" म्हणत, पाटा - वरवंटा , मुसळ, सुप, तसेच धान्य मोजण्यासाठी वापरली जाणारी शेर, मापटं ,चिपटं  इत्यादी.   

                                    Reference: Click Here

छताला बांधलेलं शीकं, normally दही,दूध किंवा चपातीची दुरडी ठेवण्यासाठी वापरलं जायचं. एका कोपऱ्यात एकावर एक ठेवलेली मडकी/हंडे, त्यात वर्षभर टिकणारी लोणची आणि उन्हाळी सामान ठेवलं जायचं. अशा या स्वयंपाक घरात वेगवेगळे पारंपरिक पदार्थ बनायचे. काही विस्मरणात गेलेले किंवा rarely बनवले जाणारे जस कि कापण्या , धपाटी, कळना ( चण्याची डाळ बनवल्यानंतर उरलेल्या भरडपासून बनवला जाणारा बेसनसारखा पदार्थ ), ठेचा माडगं, चिगळ, तांदुळशी, चुका, पातंर, कडवंच्यानसारख्या भाज्या इत्यादी. थंड पाण्यासाठी वापरला जाणारा ओलं पोतं बांधलेला पाण्याचा माठ किंवा रांजणं . तसंच जास्तीचं  सामान ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या  फडताळ, दिवळी  आणि खुंट्या दिसायच्या. 


मग ह्या स्वयंपाक घरात दाटीवाटीनं बसणारी १० ते १२ पोरापोरींची पंगत आणि मोठं कुंकू लावलेली, लुगडं नेसणारी, डोक्यावरून पदर घेणारी वाढप्याचं काम करणारी आजी. असं होत माझं लहानपणीचं स्वयंपाक घर. 
नंतरच्या दशकात छपराच्या घरांची जागा सिमेंटच्या घरांनी घेतली. स्वयंपाक घरात किचन कट्ट्याची entry झाली. चुलीऐवजी गॅस वापरले जाऊ लागले. तांब्या - पितळेच्या भांड्यांची जागा aluminium आणि stainless steel च्या भांड्यानी घेतली तर केरसुणीच्या जागी झाडू आला. उकळ, जातं , मुसळ आणि पाटा वरवंटा यांची हकालपट्टी झाली आणि त्यांच्या जागी पिठाच्या गिरण्या, मिक्सर आणि कुकर आले. इडलीचा कुकर, अप्पे पात्र आणि नॉनस्टिकची भांडी गृहिंणीचं आकर्षणं बनू लागली.


आताची आजी साडी नेसू लागली, कुंकवाऐवजी टिकली लावू लागली, पैसे वाचवून चांदीसारखी चमकणारी स्टीलची भांडी  घेऊ लागली, सर्वाना दिसतील अशी स्टीलच्या रॅकमध्ये मांडू लागली,एकावरेक पिरॅमिड सारखे पेले आणि glasses सजवू लागली. गॅस, सिमेंटच्या भिंती आणि मऊमऊ फरशांसमोर सारवनं, पोतेरं आणि लेपन लोप पावलं. दळण, भरडन, आणि कांडन्या - कुटण्यापासून सुटका झाली. चपाती, भाजी, वरण भात रेग्युलरच झालं. इडली सांबर, डोसा, ढोकळा आणि पनीर ह्यांसारख्या काही south आणि north च्या रेसिपीसचे experiments  पुस्तकांमध्ये वाचून होऊ लागले. ह्याच काळात काही जणी करिअर आणि जॉब साठी बाहेर पडू लागल्या आणि वेळेअभावी असो किंवा हौस म्हणून पण हॉटेलिंग हा concept आयुष्यात येऊ लागला. 


जात जात स्वयंपाक घराचं well furnished kitchen बनलं. जिथं फक्त किचन कट्टा, बेसीन आणि चकमकीत प्लायवूडची कपाटं दिसतात. कूकर, मिक्सर, ब्लेंडर, instapot, फ्रिज, ओव्हन, microwave , exhaust fan, टोस्टर, सँडविडचं मेकर आणि बऱ्याच अशा इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी गर्दी असते. आत्ताची जीन्स घालणारी, मॉडर्न , शिकलेली, जॉब करणारी स्त्री खूप मेहनत करून कॉस्टली crockery,स्टेनलेस स्टील, ओव्हन/microwave /डिशवॉशर सेफ, एअर tight, bpa फ्री भांडी घेते पण आता तिला ती सजवायला/दाखवायला  वेळ नाही मिळत किंवा आवडत नाही , मग ती लाखो रुपये खर्च करून well furnished kitchen बनवते आणि हि भांडी दिसू नयेत म्हणून अतोनात प्रयत्न करते. 


                                        Reference: Click Here

आता diet च्या नावानी ऑइल फ्री, शुगर फ्री रेसिपीस, सलाड, कोशिंबिरी आणि सूप इंटरनेट वर पाहून बनतात. फ्रोझन फूड ची क्रेझ वाढतीये. ताटांऐवजी ceramic crockery किंवा सरळ disposable प्लेट्स आणि cutlery चा वापर होतो. आता पंगत आणि प्रेमाने जेवायला वाढणारी आजी तर दूरच पण माणूस महागड्या डाईनिंग टेबलवर social media च्या संगतीत जेवतोय. 

Science मुळे माणसाने खूप प्रगती केली, कष्ट कमी केली पण सुख आणि समाधान मात्र हरवून बसला. भारतात अजूनतरी परिस्थिती खूप चांगली आहे पण अमेरिकेसारख्या देशात तरी पाहितिये working  couples ना सर्रास बाहेर जेवण सोईस्कर वाटतंय. येणाऱ्या भविष्यात किचन हा घराचा भाग असावा इतकीच माफक अपेक्षा. 

                                                                                              Dedicated To: माझी आजी

 मंजुश्री खटकाळे जाधव 

                                                                                                                                                                                                                                


Comments

  1. Khup sunder lihlays ga!!! God bless you! Bhabhi ani vadhegao chi aajee khup premal hoti

    ReplyDelete

Post a Comment